मुंबई, 22 जुलै
राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा, राज्यभरात विविध आरोग्य शिबिरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली विकासासाठी समर्पित केला. तेथे विविध विकास कामांचे उदघाटन, भूमिपूजन केले. वृक्षारोपणाच्या मोहीमेचा शुभारंभही केला. दरम्यान, आज दिवसभरात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या.
शुभेच्छा देणार्यांमध्ये राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यपाल, अनेक केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे तसेच इतरही अनेक मान्यवरांचा समावेश होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात 4.5 एमटीपीए स्टील प्लांटच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावली. हा विदर्भातील पहिलाच प्रकल्प असून, यातून 24,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे, तर 10,000 रोजगार निर्माण होणार आहेत. हेडरी ते कोनसरी या दोघांना जोडणारी महाराष्ट्रातील पहिल्या आणि विक्रमी वेळात पूर्ण झालेल्या स्लरी पाईपलाईनचे त्यांनी उदघाटन केले. यामुळे कार्बन उत्सर्जनात 55 टक्के घट होणार आहे. हेडरी येथील आयर्न ओर आणि ग्राईंडिंग युनिटचे त्यांनी उदघाटन केले. हे महाराष्ट्रातील पहिले युनिट आणि पोलाद क्षेत्रात नवे मापदंड स्थापन करणारे आहे. कोनसरी येथे पॅलेट प्लांटचे उदघाटन केले. हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकाच रचनेतील भारतातील सर्वांत मोठा प्रकल्प असून शाश्वत पोलाद निर्मितीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोनसरीत 100 खाटांच्या रुग्णालयाचे, आधुनिक सीबीएसई शाळेचे तसेच सोनमपल्ली येथे लॉईडसच्या टाऊनशीप त्यांनी भूमिपूजन केले. दुपारी ‘हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र’ या मोहीमेतही भाग घेतला. नवीन वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीत त्यांनी जवानांसोबत साजरा केला होता, आज या भल्या मोठ्या विकास कामांतून एकप्रकारे गडचिरोलीच्या विकासाचा टिळा मुख्यमंत्र्यांना वाढदिवशी लागला.
मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत आज राज्यभरात आरोग्याचेही अनेक उपक्रम हाती घेण्यात आले होते. रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर, आभा कार्ड वाटप, अवयव दानाचा प्रचार, कृत्रिम अवयव वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीत सुद्धा योगदान दिले.