Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

मविआकडून महाराष्ट्राची बदनामी, राज्यातील वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न

By Devendra Fadnavis on October 31st, 2022
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 31 ऑक्टोबर

महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच : देवेंद्र फडणवीस

पुराव्यानिशी प्रत्येक आरोपावर मविआला उघडे पाडले

राज्यात ‘बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप’ सरकार आल्यानंतर एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. उलट हे सारे प्रकल्प महाविकास आघाडीच्याच काळात गेलेले आहेत आणि त्याचे खापर मात्र तीन महिन्यांच्या सरकारवर फोडले जात आहे. काही ‘एचएमव्ही’ पत्रकार आणि राजकारणी मिळून ‘फेक नरेटिव्ह’ सिंडीकेट चालवित आहेत आणि त्यातून महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रपरिषदेत केला. प्रत्येक प्रकल्पनिहाय तारखा आणि त्या-त्यावेळी प्रकाशित वृत्त हे पुराव्यानिशी सादर करीत, त्यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना उघडे पाडले. फॉक्सकॉनसंदर्भात ते म्हणाले की, 7 जानेवारी 2020 रोजीच तत्कालिन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही, हे स्पष्ट केले होते. मग आता आमच्यावर टीका का? (टाईम्स ऑफ इंडियाचे वृत्त)

एअरबससंदर्भात 23 सप्टेंबर 2021 मध्येच एक वृत्त दैनिक जागरणने प्रकाशित केले आणि त्यात उत्तरप्रदेश आणि गुजरात या दोन राज्याचा विचार केला जात असल्याचे सांगितले गेले. 14 फेब्रुवारी 2022 रोजी बिझनेस वर्ल्डमध्ये एक वृत्त प्रकाशित झाले आणि त्यात गुजरातमध्ये हा प्रकल्प येणार असल्याचे वृत्त आले. अगदी आता सुद्धा इंडियन एक्सप्रेसने 30 ऑक्टोबर 2022च्या अंकात अगदी सविस्तर वृत्त दिले असून, त्यांनी टाटा कंपनीच्या संपूर्ण पत्रव्यवहाराचा संदर्भ दिला. डिसेंबर 2021 मध्येच एअरबससाठी गुजरातची जागा निश्चित झाली होती. मार्च 2022 मध्ये टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्स लि.ने (टीएसीएल) गुजरात अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग (जीएएआर) यांच्याकडे एक पत्र दिले आणि त्यात गुजरातमधील 4 जागा निश्चित करण्यात आल्याचे सांगितले, इत्यादी संपूर्ण तपशील दिलेला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सॅफ्रनच्या बाबतीत तर फेक नरेटिव्हचा कहरच केला गेला. फ्रान्सच्या भारतातील राजदूतांनी सॅफ्रनच्या हैदराबाद फॅक्टरीतील आपला फोटोच 2 मार्च 2021 रोजी ट्विट केलेला आहे. 7 जुलै 2022 रोजी हा प्रकल्प सुरू झाल्याचे फोटोसह वृत्त अनेक ठिकाणी प्रकाशित झाले आहे. आणि आता काल-परवा हा प्रकल्प गेल्याचे वृत्त मुद्दाम दिले जात आहे. ती संपूर्ण कात्रणे आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत दाखविली.

एकही प्रकल्प तर गेलाच नाही, उलट राज्यात नवीन सरकार आल्यानंतर 25 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. राज्यात उद्योगवाढीसाठी, रोजगारनिर्मितीसाठी नवे सरकार पूर्ण प्रयत्न करेल आणि राज्याला उद्योगांत क्रमांक 1 चे राज्य बनवेल. विरोधकांनी ‘एमएमव्ही’ इकोसिस्टीम हाताशी धरुन महाराष्ट्राची बदनामी करू नये, ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. उद्योग राज्यात येण्यासाठी कसे वातावरण हवे आणि गेल्या अडीच वर्षांत राज्यात कोणत्या घडामोडी होत होत्या, हे संपूर्ण देशाला ठावूक आहे. विरोधी पक्षात असून सुद्धा एअरबससंदर्भात मी राज्यातील एक नेता आणि नागरिक म्हणून कंपनीशी संपर्क केला. त्यांनी स्पष्टच सांगितले की, राज्यात उद्योगाला त्या काळात पोषक वातावरण नाही. आमचा निर्णय झालेला आहे आणि आम्ही ते उद्धव ठाकरे यांना कळविले आहे. तरीसुद्धा मी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून त्यांना पाठपुरावा करण्याचा आग्रह केला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

(माहितीसाठी प्रेसची लिंक: https://youtu.be/pEp5UJRSJHM )