Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

घरात बसणार्‍यांना मोदी-शहा काय कळणार: अकोल्यात जाहीर सभा

By Devendra Fadnavis on June 18th, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

अकोला, 18 जून

उद्धवजी, तुम्हाला कुठे आणि कशी आग होतेय हे आम्हाला ठावूक : देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंचे भाषण लिहून देणारे सुद्धा आता त्यांच्या गटात उरलेले दिसत नाही, त्यामुळे उधारीवर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ‘स्क्रिप्ट रायटर’ आणलेला दिसतो. पण, उद्धवजी तुम्हाला कुठे-कुठे आणि कशी-कशी आग होतेय, हे आम्हाला ठावूक आहे, असे सडेतोड प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अकोल्यात प्रचंड जाहीर सभेत ते बोलत होते. उद्धव ठाकरेंना जेव्हा कोणत्या नेत्याची भीती वाटते, तेव्हा ते सांगतात, त्या नेत्याचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. याच्यापलिकडे त्यांची गाडी पुढे सरकत नाही. पण, एक सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाचा बाप तोडू शकत नाही. 2019 मध्ये उद्धव ठाकरे भाजपाच्या पाठित खंजीर खुपसून खुर्चीच्या मोहाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हाच सांगितले होते, ‘मेरा पानी उतरता देख, किनारे पर घर मत बसा लेना, मै समुंदर हूँ, लौटकर जरुर आऊंगा’, मी तर आलोच, पण, येताना शिंदेंनाही घेऊन आलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते, ज्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा मी माझे दुकान बंद करीन. पण, उद्धव ठाकरेंनी त्यांचे विचार बासनात गुंडाळून ठेवले. आज ते मोदीजींबद्दल, अमितभाईंबद्दल काय काय बरळले. मला त्यांना विचारावे वाटते, कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू?, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

370 च्या माध्यमातून ज्या पक्षाने काश्मीर भारतापासून तोडण्याचा डाव आखला होता, ते कलम रद्द करुन त्यांचे मनसुबे उद्धवस्त करणार्‍याचे नाव आहे मोदी. औरंगजेबाने जे मंदिर आक्रमित केले, त्या काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण करणारे मोदी आहेत, अयोध्येत राममंदिराचा मार्ग प्रशस्त करणारे नरेंद्र मोदी आहेत. प्राण गेले तरी बेहत्तर, पण काश्मीर भारतापासून तुटू देणार नाही, हे छातीठोकपणे सांगणारे आहेत अमित शाह. घरात बसून जे राजकारण करतात, त्यांनी मोदी, शाह काय कळणार, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

आता पुन्हा 23 तारखेला पाटण्यात नेते एकत्र येणार आहेत. हातात हात घालणार आहेत, हात वर करुन एक फोटो काढणार आहेत. त्यात एक चेहरा यावेळी नवीन असेल. 2019 मध्ये सुद्धा असाच एक फोटो काढला होता. त्या फोटोत एकूण 52 नेते होते आणि काँग्रेसचे 48 खासदार निवडून आले होते. कितीही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्ष एकच असतो. उद्धव ठाकरे 2.5 वर्षांत केवळ 2 दिवस मंत्रालयात गेले, त्यामुळे आमचे नुकसान झाले. उद्धव यांची राजकीय समज कमी, म्हणून त्यांचे आमदार सोडून गेले, हे मी नाही शरद पवारांनी सांगितले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अकोला, संभाजीनगर, कोल्हापुरात जे काही घडले तो निव्वळ योगायोग नाही, हा एक प्रयोग आहे. अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी कशा निर्माण झाल्या, हा माझा प्रश्न त्यासाठी होता. पण, आता प्रकाश आंबेडकर सुद्धा औरंगजेबाच्या कबरीवर जातात. बाळासाहेब तुमच्याकडे पाहताना आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण होते. आमचा राजा औरंगजेब कधीच होऊ शकत नाही. आमचे राजे फक्त एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या देशातील राष्ट्रवादी मुस्लिम सुद्धा कधीही औरंगजेबाला राजा मानत नाही. उद्धव आणि प्रकाश आंबेडकर यांची युती आहे. आता हे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.