Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

देवेंद्र फडणवीस यांचे जपान दौर्‍यावरुन आगमन; मुंबई विमानतळावर जंगी स्वागत

By Devendra Fadnavis on August 26th, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 26 ऑगस्ट

वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो 11, मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जपानची मदत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 6 दिवसांच्या जपान दौरा आटोपून शनिवारी दुपारी मुंबईत आगमन झाले. जपानचा दौरा करुन पुन्हा मातृभूमीचे दर्शन झाले, मुंबईत आल्यावर प्रसन्न वाटतेय, अशी प्रतिक्रिया त्यांनी आगमन होताच दिली. मुंबई विमानतळावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मंत्री दीपक केसरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, कृपाशंकर सिंग आणि इतरही भाजपा नेते-कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे उत्कृष्ट संबंध जपानसोबत निर्माण केले, त्यामुळे जपान मोठ्या प्रमाणात भारताला सहकार्य करते आहे. ‘स्टेट गेस्ट’ म्हणून मला जपानने निमंत्रित केले होते. या दौर्‍यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानांचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी यांच्यासोबत बैठका झाल्या. राज्यात आपण वर्सोवा-विरार सीलिंक तयार करतो आहे, त्यासाठी मदत करण्यास जपान सरकारने सकारात्मकता दाखविली आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळताच त्यादृष्टीने पुढची पाऊले टाकली जातील. मेट्रो 11, मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पाला सुद्धा मदत करण्याची तयारी जपानने दर्शविली आहे. विविध प्रांतांच्या गव्हर्नर्सच्या भेटी झाल्या, ते गुंतवणूकदारांचे शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्रात येणार आहेत. एनटीटीने गुंतवणूक दुप्पट करण्याची तयारी दर्शविली आहे. सोनी कंपनी सुद्धा गुंतवणूक करणार आहे. जायका, जेट्रो यासारख्या कंपन्यांशी सुद्धा चर्चा झाली.

या दौर्‍यात एक बाब प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे जपानी उद्योगांना भारतात यायचे आहे. चीनमधील गुंतवणूक त्यांना सुरक्षित वाटत नसल्याने भारताकडे ते सुरक्षित देश म्हणून पाहत आहेत. इतर देशांची क्षमता नाही. नवीन भारताच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास त्यांनी दाखविला आहे. त्यातील मोठा वाटा महाराष्ट्रात यावा, असा आपला प्रयत्न राहील. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने एक विशेष चमू आम्ही तयार करणार आहोत. जपानी भाषा बोलता येणारे लोक त्यात असतील. डेटा सेंटर्स ते सेमी कंडक्टर, अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक आणण्यात येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

चांद्रयान मोहिमेच्या लँडिंगसाठी मराठी बांधव मोठ्या संख्येने जपानमध्ये एकत्रित जमले होते. त्यांच्यासोबत बसून मला हा सोहोळा पाहता आला, याचा मला अतिशय आनंद झाला. जणू भारत तेथे साकारला होता, अशी आठवण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. कोयासन विद्यापीठाने मला मानद डॉक्टरेट दिली, याचा खूप आनंद झाला, हा माझा नाही, तर महाराष्ट्राचा सन्मान आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काँग्रेस हा खचलेला पक्ष. त्यांनी देशाबद्दल विचार करणे केव्हाच सोडून दिले आहे. पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेत असले तरी चांद्रयानाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती ते घेत होते. शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान जाणार नाहीत, तर कोण जाणार, असे सांगतानाच कित्येक सर्वे येतात आणि जातात, मोदीजी नंबर एक होते, आहेत आणि राहतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

जपान दौर्‍यातून काय-काय मिळाले?

– वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो 11 (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा), मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासाठी अर्थसहाय्याचे आश्वासन

– मेट्रो स्थानकांनजीकच्या भागाचा विकास

– मेट्रो-3 साठी जायकाकडून वित्तसहाय्याची चौथी-पाचवी किस्त लवकरच/मेट्रो-3 मधील सर्व अडथळे दूर केल्याबद्दल प्रशंसा

– महामार्ग आणि स्टील पॅनेल रस्त्यांसाठी बांधकाम आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान

– एमटीएचएलमुळे तयार होणार्‍या तिसर्‍या मुंबईत बांधकाम क्षेत्रात सुमिटोमोची गुंतवणूक तसेच मेट्रो स्थानकांबाहेर उंच इमारतीच्या क्षेत्रात सुद्धा सहकार्याची हमी

– पुण्यात स्टार्ट अप हब विकसित करण्यासाठी सहकार्य

– सेमिकंडक्टर क्षेत्रात सुद्धा गुंतवणूक

– वाकायामा गुंतवणूकदारांचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात येणार

– एनटीटी डेटा आपली गुंतवणूक दुप्पट करणार, नागपूर, पुण्याला प्राधान्य

– पारंपारिक जलस्त्रोतांचे संवर्धन

– मराठी विद्यार्थ्यांना बुद्धीस्ट स्टडिजसाठी सुविधा

– आयआयटी मुंबईसोबत संशोधन सहकार्य

– कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट