Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

भाजपाची नाही, ही भारतासाठीची महत्वाची निवडणूक

By Devendra Fadnavis on March 12th, 2024
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 12 मार्च

देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटकात संमेलने, संवाद

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटकात आपल्या क्लस्टर दौर्‍यांतर्गत बुथ कार्यकर्त्यांची संमेलने, बुद्धीजिवी संमेलने घेतली आणि उद्योजकांशी सुद्धा संवाद साधला. प्रामुख्याने मंगळुरु आणि उडूपी येथे त्यांचे कार्यक्रम झाले. आगामी निवडणूक ही भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्त्वाची आहे, असा संदेश त्यांनी या दौर्‍यात दिला.

मंगळुरु येथे बुथ कार्यकर्ता संमेलनात बोलताना ते म्हणाले की, 2024 ते 29 हा काळ फार महत्त्वाचा आहे. आज आपण 11 वरुन 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. भारताला 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्यासाठी 68 वर्ष लागले. मोदीजींनी केवळ 10 वर्षांत 4 ट्रिलियनपर्यंत आणले. आता येणार्‍या काळात आपण जागातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहोत. ही मोदीजींची गॅरंटी आहे.

मोदीजींनी लाभ वितरणाची एक व्यवस्था तयार केली. काँग्रेसच्या काळात 15 पैसेच खालपर्यंत जायचे आणि हे स्वत: त्यांचे पंतप्रधान सांगायचे. आज घरे, शौचालये, मुद्रा, किसान सन्मान हे सारे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जातात, पण, त्यासाठी कुणाला लाच द्यावी लागत नाही. परिणामी 25 कोटी लोक गरिबी रेषेतून बाहेर आले. एका सर्वेक्षणानुसार, तीव्र गरिबी या वर्गवारीत आता केवळ 3 टक्के लोक आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अग्नि-5 मुळे आपण रशिया, अमेरिका, चीन अशा देशांच्या पंक्तीत जाऊन बसलो आहोत. आता 7000 कि.मी.पर्यंतही आपण लक्ष्यावर मारा करु शकतो. चीनच्या सीमेवर रस्ते बांधण्याचे काम मोदी सरकारने केले. त्यातून संरक्षण दलांना मोठी सोय झाली आहे. आता भारत आयातदार नाही, तर निर्यातदार आहे. जो मजबुत देश आहे, तोच जगात शांतता प्रस्थापित करु शकतो. आज जगातील 19 देश आपल्या पंतप्रधानांना त्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करतात, यातून भारताची जगात निर्माण झालेली ताकद लक्षात येते. देशात दुप्पट विमानतळ तयार झाले. कोणताही उद्योग तेथेच येतो, जेथे विमानतळांच्या सुविधा असतात. विद्यापीठांची संख्या अडीच पटींनी वाढली. शिक्षणाच्या चांगल्या सोयी तयार झाल्या की, रोजगारक्षम युवा तयार होतात. हे शिक्षण सुद्धा मातृभाषेतून असल्याने विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे, असेही ते म्हणाले.

कर्नाटक सरकारने देशविरोधी तत्वांना साथ देते आहे, हे कधीच माफ केले जाणार नाही. पीएफआयवर बंदी टाकल्यानंतर त्यांची येथे सुटका केली गेली. बॉम्बस्फोट झाल्यावर तो प्रेशर कुकरचा स्फोट सांगितला जातो. देशविघातक शक्तींना ताकद देणार्‍यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. म्हणूनच ही निवडणूक केवळ भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्त्वाची आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.