Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

न्यायालयाच्या आदेशाने चौकशी, त्याला सामोरे जा! वीर सावरकरांच्या अपमानाबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी : देवेंद्र फडणवीस

By Devendra Fadnavis on June 13th, 2022
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, 13 जून

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर चौकशी होत असेल तर त्याला सामोरे जायला हवे. सामान्य जनतेला अकारण वेठीस धरण्याचा प्रयत्न करु नये. काँग्रेसच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांना ईडी चौकशीसाठी बोलाविले असताना आज काँग्रेस पक्षाने विविध शहरात जनतेला वेठीस धरले. ही चौकशी न्यायालयाच्या निर्णयानंतर झाली आहे. एजेएल ही कंपनी 1930 च्या दशकात 5000 स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येत स्थापन केली. मात्र, 2010 मध्ये यंग इंडिया कंपनीची स्थापना करीत या कंपनीचे सर्व समभाग हस्तांतरित करण्यात आले आणि सुमारे 2000 कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्यात आली. हा प्रश्न न्यायालयात गेला तेव्हा 2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय गंभीर आक्षेप त्यावर नोंदविले आहेत आणि हा भ्रष्टाचार आहे, असे सांगितले आहे. पण, आज जणू आपण निर्दोष आहोत, असे भासविण्याचे काम होते आहे. काँग्रेसने बाऊ करण्याऐवजी चौकशीचा थेट सामना करावा. आमचे आदर्श स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जन्मठेपेच्या 2 शिक्षा भोगल्या. आज त्यांच्याविरोधात फलकं लावून राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा अपमान करते आहे. स्वतः 2000 कोटी रुपयांची मालमत्ता हडप करायची आणि वीर सावरकर यांचा अपमान करायचा, हे निषेधार्ह आहे. त्यांनी देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ओबीसींची संख्या कमी करण्याचा घाटओबीसी आरक्षणासंदर्भात एम्पिरीकल डेटा गोळा करण्याच्या कामात प्रचंड गोंधळ सुरू आहेत. ओबीसींची संख्या घटलेली दिसेल, अशा पद्धतीने हे काम होते आहे. हे सरकार नेहमीच उशिरा जागे होते, म्हणून मी आजच सरकारला इशारा देतो आहे. याचा संपूर्ण तपशील योग्य वेळी मी देईनच. मध्यप्रदेश सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे काम केले. एकदा हे सर्वेक्षण पूर्ण होऊन, न्यायालयात सादर झाले की मग त्यातून माघार घेता येणार नाही आणि ओबीसींचे कायमस्वरूपी आणि मोठे नुकसान झालेले असेल. त्यामुळे आजच सावध व्हा. अन्यथा भाजपला पुन्हा मैदानात उतरावे लागेल, असा इशारा आज देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

विधानपरिषद निवडणूक निवडणूक बिनविरोध होईल, अशी आमची अपेक्षा होती. पण सत्ताधारी पक्षांना त्यात यश मिळू शकले नाही. काँग्रेसने नकार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. आमचे 5 उमेदवार आहेत. आम्ही सर्व 5 जागा जिंकू, हा पूर्ण विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.

(माहितीसाठी संवादाची लिंक : https://youtu.be/b63Ku6SLko8 )