Subscribe for Latest updates!

*Your details are safe with us. We do not share or spam our valuable visitors*

सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्येसीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठित

By Devendra Fadnavis on May 24th, 2023
Df_Press-Release-Page_Feature-Image

press release

मुंबई, २४ मे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*कार्यक्रमाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘आयआयटी’, मुंबई आणि ‘आयआयएम’, नागपूर यांच्यासमवेत सामंजस्य करार*

ज्ञान आणि कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्ये सीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठित ठरत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम समवेत ‘आयआयटी’, मुंबई आणि ‘आयआयएम’, नागपूर यांच्यासमवेत सामंजस्य करार झाला.

यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, ‘आयआयटी’ मुंबई चे संचालक सुभाशीष चौधरी, ‘आयआयएम’ नागपूर चे संचालक भीमराय मेत्री हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीएम फेलोशिप प्रोग्राम 2015 मध्ये सुरू करण्यात आला. तरुणांचे ज्ञान आणि कौशल्य अधिक वृद्धिंगत करत त्यांना शासकीय यंत्रणेची ओळख करून देणारा हा कार्यक्रम अत्यंत पारदर्शकपणे व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविण्यात येतो.

विविध क्षेत्रातील अनेक चांगले फेलोज या योजनेच्या माध्यमातून राज्याला मिळाले. अनेक उच्चशिक्षित तरुण करियरच्या मोठ्या संधी नाकारून या योजनेला प्राधान्य देतात हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

या कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या फेलोंकडे विविध क्षेत्रातील अनेक नाविन्यपूर्ण कल्पना असतात, ज्याचा राज्याच्या विकासप्रक्रियेत खूप फायदा होतो. सीएम फेलोशिप प्रोग्रामला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली असून आता ‘आयआयएम’ आणि ‘आयआयटी’ सारख्या जगप्रसिद्ध संस्था या कार्यक्रमाशी जोडल्या जात आहेत हे खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संस्थांच्या मार्गदर्शनाद्वारे सीएम फेलो अधिक कौशल्य व अधिक ज्ञान संपादन करू शकतात. यांसारख्या अन्य संस्थांचाही यामध्ये यापुढे समावेश करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सीएम फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या विकासप्रक्रियेत योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याची तसेच यापुढेही अशाप्रकारच्या सहकार्य कार्यक्रमांत सहभागी होण्यास उत्सुक असल्याची भावना ‘आयआयटी’ मुंबई चे संचालक सुभाशीष चौधरी व ‘आयआयएम’ नागपूर चे संचालक भीमराय मेत्री यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये हा कार्यक्रम पुन:श्च सुरु केला आहे.

भारत हा युवा देश आहे आणि तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम युवकांना शासनासोबत जवळून काम करण्याची व राज्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची संधी देतो. सार्वजनिक धोरणांवर काम करण्याचा अनुभव व त्यातून मिळालेले धडे या कार्यक्रमातील फेलोंसाठी मोलाचे ठरतात. फेलोंच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो. प्रशिक्षण कार्यक्रमाशिवाय, महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत संवाद व विविध संस्थांना भेटींचे आयोजन केले जाते. या संवाद व भेटींच्या माध्यमातून फेलोंना खूप काही शिकता येते. फेलोंनी काम करताकरता शिकणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी फेलोंना मार्गदर्शन करतात.

#Devendrafadnavis #Maharashtra